वक्तृत्व
(कृपया पूर्वपरवानगी शिवाय ही पोस्ट मुद्रित किंवा प्रकाशित करू नये.
नुकतीच लोकमान्य टिळकांची जयंती झाली. त्यावरून मला एक जुना किस्सा आठवला. मी शाळेत असतांना या काळात म्हणजे पावसाळ्यात वक्तृत्व स्पर्धा होत असत. टिळक जयंती ला तर हमखास या स्पर्धा असत. मी मुळात अत्यंत लाजरा, बुजरा. वर्गात कधी सरांनी एखादा प्रश्न विचारला तर उत्तर येत असूनही हात वर करायला घाबरायचो. आपलं काही चुकलं तर? मुलं हसली तर? अशी भीती कायम मनात असायची. एखाद्याची फजिती झाली कि वर्गातली टवाळ मुलं त्याला समजून घेण्याऐवजी कायम चिडवायची त्यामुळे अशी मानसिकता बऱ्याच मुलांची होत असते. क्वचित सरांनी एखाद्या प्रशांसाठी उभं केलंच, तर छातीत धडधड व्हायची. इकडे घरून आईचा मात्र वक्तृत्व स्पार्धेत भाग घे असा धोशा असायचा. धोशा काय, सक्तीचं असायची. मला वक्तृत्व हा प्रकार बिलकुल आवडायचा नाही. स्पर्धेत भाग घेणं नकोस व्हायचं. बक्षीस मिळण्याचा तर प्रश्नच नव्हता. चुकून मिळालं तर ते घेण्यासाठी स्टेज वर जावं लागेल आणि नक्की काहीतरी फजिती होईल आणि मुलं हसतील हा विचार डोक्यात बसलेला होता. आईच्या आग्रहाखातर संस्कृत आणि चित्रकलेच्या दोन परीक्षा मी दिल्या होत्या. चित्रकला मला फार आवडायची. मी तासनतास चित्र काढत बसायचो. माझा मामेभाऊ हृदयनाथ याला माझ्या चित्रकलेचे खूप कौतुक होते. माझे काका उत्तम चित्र काढत असत. एका राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत मी भाग घेतला. त्यासाठी मी एक सरस्वतीचे चित्र काढले. मी काकांकडून चित्र काढून घ्यावे असे मला सुचवले गेले होते. पण मी त्यास नकार दिला. माझ्या एका भावाने एका उत्कृष्ट चित्रकारकडून चित्र काढून घेऊन त्या स्पर्धेत ते त्यांच्या नावाने दिले होते. त्यामुळे मला बक्षीस मिळण्याची सुतराम शक्यता नाहीं हे मी आधीच ओळखले होते. मी काढलेले सरस्वतीचे चित्र मला स्वतः ला खूप आनंद आणि समाधान देऊन गेले. स्पर्धेतील मोजकी चित्रे रुंगठा हायस्कुल येथील प्रदर्शनात समाविष्ट केली जाणार होती. माझे चित्र किमान त्यात डिस्प्ले झाले तरी मला आनंद मिळणार होता कारण ते चित्र कोणाच्याही मदतीशिवाय मी पूर्ण केले होते. बक्षीस वितरण करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार येणार होते. मी बहुदा तेव्हा इयत्ता सातवीत असेल. दिलीपकुमार हे नाव मी प्रथमच ऐकत होतो पण लोकांमध्ये त्या नावाची खूप क्रेझ होती. कार्यक्रमास प्रचंड गर्दी होती. बक्षीस विजेता म्हणून माझं नाव जाहीर झालं आणि स्टेजच्या भीतीने पुनः डोकं वर काढलं. गर्दी आहे आणि आपण वेळेत स्टेजवर पोहोचणार नाही अशी मनाची सोयीस्कर समजूत करून घेत मी स्टेजवर जाणं टाळलं. माझं चित्र प्रदर्शनात बघून मात्र मी हरखून गेलो. सरस्वतीचा मला आशीर्वाद लाभला होता.
सुमारे दोन हजार मुलांसमोर भाषण देणे म्हणजे माझ्यासाठी अशक्य काम होते. त्यात मी टिळकांच्या वर भाषण करणाऱ्या मुलांचं वक्तृत्व ऐकलेले होते. मुलं फार प्रभावी बोलत असत. त्यात आवेश, नाट्य, अभिनय भरलेला असे. मला हे जमणारे नव्हते. मी स्पर्धेत नावच दिलं नाही. घरी खोटं सांगितलं कि नाव दिलं आहे. काही कारणाने वडील शाळेत आले होते तेव्हा त्यांनी सहज चौकशी केली तर त्यांना समजले कि माझे नाव यादीत नाही. त्यांनीं ते नाव टाकण्यास सांगितले. टिळकांची जयंती आली. बाहेर धो धो पाऊस चालू होता. माझ्या मनात विजांचा गडगडाट सुरु होता. काहीतरी चमत्कार व्हावा आणि धरणीने पोटात घ्यावे असे वाटत होते. मी इतर मुलांची प्रॅक्टिस बघत होतो. अध्यक्ष महाशय आणि गुरुजन अशी सुरुवात होती. शेंगा आणि टरफले हि गोष्ट होती. काहीतरी बोलून वेळ मारून नेणे भाग होते. मी भाषणासाठी उभा राहिलो आणि सुरुवात करतानाच थरथरत बोललो 'अध्यक्ष महाजन!" सर्वजण हसायला लागले. काही शिक्षकांनी माझी टर उडवली. माझ्या डोळ्यात पाणी तरळले. मला शिक्षकांनी नंतर बोल असं सांगून बाजूला घेतलं. मी फजित होऊन, खाली मान घालून बसून राहिलो. मला जबरदस्ती करणाऱ्या आईचा मला विलक्षण संताप आला. पण घरी यातलं काही सांगण्याची सोया नव्हती. नाहीतर मी मार खाल्ला असता.
यथावकाश मी तरुण झालो.मला वाचनाची गोडी लागली होती. वडिलांच्या इच्छेनुसार मी शाळेत असतानाच तबला शिकलो होतो. मी गाण्यांना तबला साथ करत असे. त्यावेळी मला भीती वाटत नसे. इंग्रजी, गणित, वक्तृत्व, मारामाऱ्या आणि मुलींशी बोलणं या सर्वना मी फार घाबरत असे. पण तारुण्य आव्हान झेलण्याची शक्ती देतं. मी एकदा ठरवलं की ज्या गोष्टीची भीती वाटते ते ते करायचं. टिळकांबद्दल मी वाचू लागलो. टिळक आणि विवेकानंद, टिळक आणि गजानन महाराज हे सर्व समजून घेताना मी भारला गेलो. स्टेज डेरिंग यावं म्हणून मी आरशापुढे सराव करू लागलो. शाळेत असताना मी नाटकात काम केली होती. त्यात मी गर्दीत असायचो. पण एकदा एका नाटकात 'रामू' चे कॉमेडी काम केले त्यावेळी सर्वांनी दाद दिली होती. मी चार्ली चॅप्लिन चे चरित्र वाचले. स्टेज च्य भीतीवर मात केली. उच्चार सुधारले. माईक वर बोलण्याची प्रॅक्टिस केली. पुढे रेडिओ विश्वास वर मी अनेक कार्यक्रम सादर केले, अजूनही करतो. सूत्रसंचालनसाठी मला अनेक ठिकाणाहून बोलावणे येऊ लागले. अलीकडे भगवान महावीर जयंती ला मी पाच हजार लोकांसमोर सूत्र संचालन केले. अनेक विनोदी स्कीट मी लिहिली आणि सादर केली. काही टीव्ही वरही गाजली.
बारा राशींवर आधारित राशीभाव हा कार्यक्रम मी लिहिला आणि सादर करू लागलो. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. काहींनी त्याचे चित्रीकरण हि केले. एका बाईनी तर माझा राशीभाव अवडल्याबद्दल माझ्या आईला साडी भेट दिली. आईच्या डोळ्यात अश्रू आले कारण तिने तो कार्यक्रम पाहिलाच नव्हता. मग मी आई वडिलांसाठी त्यांच्या जेष्ठ नागरिक मंडळात खास शो केला. मला एक तासाची वेळ दिली होती. पण दोन तास कार्यक्रम रंगला. आई वडील समोरच बसले होते. माझं वक्तृत्व बरसत होतं आणि ते शिकावं म्हणून जीवाचा आटापिटा करणारी आई समोर बसली होती. एकदा मी सहा तासांचा राशीभाव केला. प्रत्येक राशीवर अर्धा तास बोललो. हे सर्व यश आई वडिलांचं आहे हे मला आता समजत होतं. शाळेत असताना आई वडील सांगत असतात ते ऐकणं किती गरजेचं असतं ते मला आता पटलं होतं.
चार महिन्यापूर्वी माझ्या एका राशीभाव कार्यक्रमास दोन बोहरी समाजाचे लोकं मला दिसले. सहज म्हणून उभे असलेल्या त्यांना पूर्ण कार्यक्रम आवडला. त्यांनी मला त्यांच्या घरी नेलं. त्यांच्या धर्मावर त्यांच्या लोकांसमोर मी बोलावं अशी ईच्छा त्यांनी प्रकट केली. माझं वक्तृत्व त्यांना आवडलं होतं. मला पुनः टिळक आठवले. योगायोगाने माझे आई वडील त्याही कार्यक्रमास होते? वक्तृत्वाने मला सर्वकाही दिलं. मृत्यूनंतर अनेक रुपाने उरलेल्या लोकमान्य टिळकांनी माझ्यासारख्या असंख्य अतिसामान्य लोकांना प्रेरणा दिली. ते भारतीय स्वातंत्र्याचे जनक तर होतेच पण मला माझ्याच न्यूनगंडातून त्यांनी स्वातंत्र्य दिलं. टिळकांनी टरफले उचलली नाहीत पण आम्ही त्यांच्याचमुळे यशाचे शेंगदाणे खात आहोत. आणि याचं श्रेय जितकं टिळकांना जातं तितकंच माझ्या आईला हि आहे.
- मंगेश पंचाक्षरी, नासिक.
Comments
Post a Comment