-मंगेश पंचाक्षरी, नासिक.

     अगदी सुरुवातीला 'मोबाईल' विकत घेताना खूप पैसे घालवल्यावर आता यावर जास्त खर्च करायचं नाही असं आम्ही ठरवलं. काही काळ आम्ही अगदी साधा मोबाईल वापरला. त्यात काही न काही प्रापंचिक खर्च वाढत असल्याने मोबाईल केवळ फोन घेणे आणि करणे इतपतच मर्यादित झाला. त्या काळात तसेही स्मार्ट फोन नव्हते. केमेरा ही नुकताच मोबाईल मध्ये समाविष्ट झाला होता. आम्ही नोकियाचं बेसिक मॉडेल वापरत होतो. आम्हाला पुत्ररत्न झाल्याने दवाखाना वगैरे बराच खर्च झाला होता. पण आमच्या प्रेमळ 'सौ' नवीन मोबाईल विकत घ्या म्हणून मागे लागल्या होत्या. आम्ही हसून टाळत होतो. एकदा आमच्या मोबाईल सारखं सेम मॉडेल सौ ने घंटागाडीवाल्याकडे पाहिलं मात्र, सौ ने आमचा मोबाईल सिमकार्ड काढून त्याच घंटागाडीत फेकून दिला. आता आमची पंचाईत झाली. मग सौ नेच बचत केलेल्या पैशातून आम्हाला एक नोकिया 6600 मोबाईल विकत घेऊन दिला. त्या काळात हा मोबाईल बराच महाग होता आणि त्या मॉडेलची सर्वात जास्त क्रेझ होती.

     आमच्या एका मित्राचे त्या दरम्यान कर्नाटक मधील 'यादगीर' गावात लग्न होते. लग्नास आम्ही यावे असा त्याचा फार आग्रह होता. अजून पाच मित्र तयार होते आणि लग्न लागले की तसेच पुढे हैद्राबादला जावे असा त्यांचा प्रस्ताव होता. आमचे चिरंजीव अगदीच लहान होते. त्यांचं बारसं करायच होतं. पत्रिकेप्रमाणे 'छ' अक्षर आल्याने कृष्णाचे 'छंदज' हे नाव ठेवण्याचे आम्ही नक्की केलं. बारशाची तयारी सुरू होती. पण मित्र हटून बसले की मारुती वॅन घेऊन ही ट्रिप करायचीच. टूरवर निघण्याच्या आदल्या दिवशीच सौ ने आम्हाला हा मोबाईल भेट दिला. त्यात  कॅमेरा कम विडिओ शूटिंग असल्याने आम्ही अगदी खुश होतो. आमच्या कृष्णाचे काही फोटो आम्ही त्यात काढून तो वॉलपेपर केला आणि आनंदाने सहलीस निघालो. नासिक सोडत नाही तोच आमच्या त्या सुंदर, नवीन मोबाईल च्या डिस्प्लेवर फक्त रंगाचे पट्टे वरून खाली जाऊ लागले. त्यावर फोन येईना, कॉल होईना, फोटो निघेना. आम्ही बिल ही जवळ ठेवले नव्हते. आता पूर्ण ट्रिपमध्ये फोटोग्राफी करण्याचं आमचं स्वप्न भंगले. आम्हाला लहानपणापासून फोटोग्राफीची अत्यंत आवड असल्याने आम्ही हा पहिला कॅमेरा मोबाईल घेतला होता. आमचा हिरमोड झाला. इतका महागडा मोबाईल काही तासात बिघडला.

     आमचा पहिला स्टॉप सोलापूरला होता. तिथे मित्राकडे चहा- पाणी करून आम्ही अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या मंदिरात गेलो. आमचं कशातच लक्ष लागत नव्हतं. स्वामींचे दर्शन घेताना मनात मोबाईल बिघडला हेच विचार येत होते. मन एकाग्र होणं तर दूर, पण निराशेने आणि रागाने भरून गेलं होतं. इतक्या दूर येऊन स्वामींची दोन मिनिटे आराधना करणेही मनातून जमत नव्हतं. शेवटी डोळे मिटून आम्ही स्वामींनाच आव्हान दिलं. त्यांना मनातल्या मनात म्हंटलं "तुमच्या दर्शनाला लाखो लोक इतक्या लांब येतात, करोडो लोकं तुम्हाला घरी पूजतात त्याचा काय उपयोग? तुम्ही जर खरंच काही शक्ती वगैरे असाल तर आताच्या आता माझा मोबाईल दुरुस्त करा तरच मी तुम्हाला मानेल!" वास्तविक असं बोलणं योग्य नव्हतं पण आमचा उद्वेग मनापासून बाहेर येत होता. कालपासून कितीदा तरी आम्ही मोबाईल चालू बंद करून, बॅटरी काढून पाहिला होता पण मोबाईल ढिम्म काम करेना. त्यामुळे घरी आमचा संपर्कही होत नव्हता. मित्रांच्या मोबाईल वरून किती वेळा फोन करणार ना! शिवाय आता रोमिंग सुरू होणार होतें. आम्ही स्वामींना व्याकुळ होऊन प्रार्थना केली मात्र, आणि आमचा मोबाईल त्याच क्षणी पूर्ववत झाला. आमचा या 'चमत्कारावर' विश्वासच बसेना. आम्ही तिथेच जरावेळ ध्यान लावले. आम्हाला आदेश आला की चिरंजीवाचे नाव स्वामी समर्थांवरून 'समर्थ' ठेवावे. आम्ही तिथूनच सौ ना त्याच मोबाईल वरून फोन करून सर्व प्रकार सांगितला. पुढे आम्ही कर्नाटक आणि नंतर हेंद्रबादला गेलो. तेथे एका दालनात बर्फावरचे खेळ (आईस स्केटिंग) होते. आम्ही ते ही केले तेव्हा सर्वांच्या मोबाईल मध्ये धुकं (मॉइश्चर) पकडलं पण आमचा मोबाईल छान काम करत राहिला. त्या अक्कलकोटच्या प्रसंगा नंतर आजतागायत तो मोबाईल कधीही बिघडला नाही. आजही तो मोबाईल उत्तम चालू आहे. आमचा चिरंजीव 'समर्थ मंगेश पंचाक्षरी' आता अकरा वर्षांचा आहे. त्याच्या निमित्ताने आमचा दिवसभर समर्थ- समर्थ असा 'जप' होत असतो.

- मंगेश पंचाक्षरी, नासिक.

Comments

Popular posts from this blog

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव