एका बँकेत आमचे कर्ज होते.  त्या शाखेत एक नवीन शाखाधिकारी आले होते. त्यांची आणि माझी ओळख नव्हती. मी कामानिमित्त बाहेर गावी होतो. मी त्यांना भेटायला गेलो नव्हतो याचा त्यांना बहुदा राग असावा. त्यांनी माझ्या घरी फोन केला आणि कर्जासबंधी सौ ला माहिती विचारून फैलावर घेतले. मी नाशिकला आल्यावर सौ ने आम्हाला फैलावर घेतले आणि ताबडतोब त्या शाखाधिकाऱ्याची बदली करा असे आम्हाला फर्मान सोडले. आमच्या सौ ना असे आदेश देण्याची सवय आहे. पण आमच्या सांगण्यावर बदली होणार कशी? मग आम्ही त्या बँकेच्या चेअरमन साहेबांकडे गेलो. त्यांनी आमच्यासाठी चहा मागवला. आम्ही चहा पिताना त्या शाखाधिकाऱ्याची वारेमाप स्तुती केली. वेळप्रसंगी ते साहेब आम्हांला नियमाच्या बाहेर जाऊन मदत करतात असंही सांगून इतका चांगला माणूस त्या शाखेत दिल्याबद्दल आभार मानले. आमच्या या कमेंटवर चेअरमन साहेब चहा पिता पिता काही क्षण थांबले. आम्ही समजलो की आमचे काम झाले. चेअरमन साहेबानी "बँक तुमच्या सेवेसाठीच आहे वगैरे वाक्य आमच्या तोंडावर फेकली". प्रत्यक्षात त्या शाखाधिकाऱ्याची दोन दिवसात बदली झाली. कधी कधी तक्रार करण्याऐवजी अति स्तुती करूनही काम साध्य करता येते. आमच्या सौ ना आमचा अभिमान वाटला.

     आपण जे बोलतो त्यात जेवढा अर्थ असतो त्याहून जास्त अर्थ दोन शब्द किंवा वाक्यांमधल्या पॉज मध्ये असतो. 'मिनींग बिटविन लाईन्स' ओळखणे खूपच महत्वाचे असते. योग्य वेळी बोलणे जितके महत्वाचे असते त्याहून काही वेळी न बोलणे जास्त महत्वाचे असते. "अनेक नेत्यांना हा गुण उपजतच असतो. आपल्या एखाद्या प्रस्तावावर समोरचा व्यक्ती कसा व्यक्त होतो, काय रेऍक्ट करतो, किती वेळाचा पॉज घेतो, त्याची देहबोली कशी बदलते यावरून बराच अंदाज लावता येतो. एरवी लोकं तोंडावर एक बोलतात आणि मनात मात्र दुसरेच चालू असते. ते ओळखणे ही कला प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे. माणसांचं सूक्ष्म निरीक्षण केलं पाहिजे. ओठातलं बोलणं तर सर्वांनाच ऐकू येतं, पोटातलं बोलणं समजलं पाहिजे. माणसाचं व्यक्तिमत्व त्याच्या बोलण्यातून नाही, त्याच्या शांततेतून, देहबोलीतुन समजतं. तासनतास बोलणाऱ्याला कोणीच गंभीर्याने घेत नाही. क्वचित बोलणाऱ्याच्या शब्दाला जास्त मान असतो. "मौनं सर्वार्थ साधनम" म्हणतात ते काही उगाच नाही.

© मंगेश पंचाक्षरी, नासिक.

Comments

Popular posts from this blog

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव