© मंगेश पंचाक्षरी, नासिक.

     लहान मुलं भविष्य काळ रंगवण्यात दंग असतात. त्यांना असं झालेलं असतं की कधी एकदा मी मोठा होतो. मी मोठा झालो की माझ्या मनाप्रमाणे वागणार. आवडेल ते खाणार, गाडी चालवणार असं सतत भविष्यकाळाबद्दलच स्वप्न ते बघत असतात. तरुण लोकं वर्तमानात जगत असतात. आजचा दिवस जगून घ्या, उद्या कोणी पाहिलाय असं त्यांचं मत असतं. नवनवीन प्रयोग करून बघण्याचा उत्साह असतो. आपल्याला कधी म्हातारपण येणार आहे अशी कल्पनाच ते करत नसतात. म्हातारी माणसं भूतकाळात रमत असतात. गतकाळातील वैभवशाली क्षणांच्या आठवणी ते भेटेल त्याला ऐकवत असतात किंवा त्यात रममाण होत असतात.

     लहानपणी देहाबद्दल फारसं समजत नसतं पण तरुणपणी मात्र शरीराचे चोचले पुरवण्याबद्दल जबरदस्त आसक्ती असते. भौतिक सुखाच्या मागे तरुणपण आपल्याला पळवत असते. पैसा, सत्ता, यश, कुरघोड्या, मत्सर याभोवती हा काळ फिरवत ठेवतो. धावपळ, प्रवास, पार्ट्या, ताण तणाव झेलण्याची ताकद या काळात शरीरात असते. हे जग सुंदर वाटत असते आणि हा जीवनप्रवास कधी संपूच नये असं वाटत राहतं. जीवनाबद्दल कमालीची आसक्ती निर्माण होते. पण निसर्गाने म्हातारपणाच वरदान आपल्याला दिलेलं आहे.

     म्हातारपण कोणालाच नको असतं. पण सुरकूतलेला चेहरा, दात नसलेलं तोंड, दुखणारे गुडघे, अधू नजर आणि कान, पिकलेले केस, वाकलेली कंबर शारीरिक सौंदर्याच्या आकर्षणातून व्यक्तीला बाहेर काढतात.
 जीवनाचा भरपूर अनुभव घेऊन झालेला असतो.

पिकल्या केसांच्या म्हाताऱ्या बायकोवरचं प्रेम खऱ्या, अशारीरीक प्रेमाची ओळख करून देतं. ज्या शरीरसुखाच्या मागे आयुष्यभर धावलो ते किती फोल, पोकळ होतं याची जाणीव होते. ईश्वरचिंतनाची, त्या निराकार अगाध शक्तीची आस लागते. हिंदू तत्वज्ञानानुसार मुक्ती ची ओढ लागते. जन्मा मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडावे से वाटू लागतं. त्यासाठी विरक्तीची गरज असते. म्हातारपण विरक्ती येण्यास मदत करते. अनंताच्या प्रवासाला जाताना कशातच मन अडकू नये म्हणून म्हातारपणी माणूस भविष्याचा नाही तर भूतकाळात रमत रहातो. ज्या शरीराने आयुष्यभर सुखोपभोग दिले, ते शरीरही आता नकोसं होतं. म्हातारपण म्हणजे निसर्गाने मानवाला मुक्त होण्यासाठी दिलेलं वरदान आहे. घरसंसार, संपत्ती, नातीगोती यातून माणसाला योग्य वेळी विरक्त मात्र होता आलं पाहिजे. जर आयुष्यच इतकं सुंदर आहे तर मृत्यू किती सुंदर असेल?

© मंगेश पंचाक्षरी, नासिक.

Comments

Popular posts from this blog

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव