© मंगेश पंचाक्षरी, नासिक.

     अनेकांना असा प्रश्न पडतो की जुळ्या लोकांची कुंडली एकसारखी असते तर मग त्यांचे भाग्य वेगळे कसे? एकाच वेळी जन्माला आलेल्या दोघांची कुंडली सारखी असताना भविष्य वेगळे कसे असते? वरवर हा प्रश्न योग्य वाटत असला तरी ज्यांचा ज्योतिष्याच्या गणिताचा अभ्यास आहे, ज्यांच्या कानावरून 'लांकोदय पळे' किंवा लाहिरी टेबल वगैरे शब्द गेले असतील, त्यांना याची उत्तरे माहिती असतात. आपल्या देशात एकच टाइम लाईन आहे. ती अलाहाबाद वरून जाते. म्हणजे अलाहाबादला जी वेळ असते ती संपूर्ण भारताची वेळ समजली जाते. यास 'इंडियन स्टॅंडर्ड टाइम' असे म्हणतात. ज्योतिषी मात्र जातकाच्या जन्माची वेळ गणिताने काढत असतात. त्यास 'स्थानिक वेळ' म्हणतात. असे गणित करण्यासाठी अर्थातच जन्माच्या ठिकाणचे 'अक्षांश आणि रेखांश' गृहीत धरले जातात. त्यानुसार स्थानिक वेळ ही इंडियन स्टँडर्ड टाइम पेक्षा वेगळी येते. म्हणजेच यात अक्षांश आणि रेखांश अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात. आता यापुढील प्रश्न म्हणजे एकाच गावात सुद्धा अक्षांश आणि रेखांश यात सूक्ष्म फरक असतो हे आपण जीपीएस वापरताना अनुभवले आहे. उदाहरणार्थ दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबई यात देखील अक्षांश आणि रेखांश यात सूक्ष्म फरक असतो. याच आधारे जीपीएस आपल्याला मार्ग दाखवत असते. हळूहळू हा फरक इतका सूक्ष्म होत जातो की एकाच दवाखान्यात एकाच वेळी दोन वेगवेगळ्या खाटेवर जन्मास आलेल्या व्यक्तींच्या जागेत आणि अर्थातच कुंडलीत देखील सुक्ष्मसा फरक असतो. जुळ्या मुलांच्या जन्मात काही वेळेचा किंवा मिनिटांचा  फरक असतो.  एकूणच "कोणत्याही दोन जीवांची कुंडली पूर्णतः कधीही सारखी नसते".(© मंगेश पंचाक्षरी)

     या सूक्ष्म फरकाने आयुष्यात किती फरक पडू शकतो हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ शकतो. एकदा एका अंतराळ गणितात असाच मोठा फरक पडत होता. बरीच तपासणी केली तरी त्या फरकाचे कारण समजत नव्हते. सगळे अंक (फिगर्स) तर बरोबर होते. अखेर त्याचे कारण समजले. जसे आपण गणितातील 22/7 चे उत्तर 3.14 असे लिहितो, जास्त खोलात गेल्यास ती संख्या 3.1415927 असे लिहितो. मात्र त्याहून जास्त खोलात गेल्यास पुढील संख्या बदलत जाते. वरवर किरकोळ वाटणारा हा फरक खूप मोठा बदल घडवून आणू शकतो. त्या अंतराळ गणितात असेच घडत होते आणि अंतिम उत्तर चुकत होते. यास 'बटरफ्लाय' इफेक्ट म्हणतात. जगाच्या एका टोकाला एखाद्या फुलपाखराने पंख हलवल्यास निर्माण होणाऱ्या हवेतील किरकोळ फरकाने जगाच्या दुसऱ्या टोकास वादळ निर्माण होऊ शकते अशी ही थेअरी आहे. याचप्रमाणे ज्योतिष्यात देखील किरकोळ फरक मोठा बदल घडवून आणू शकतो. आमच्याकडे युरोप मधून पत्रिका तयार करण्यासाठी येतात. तेव्हा त्यात 'डे लाईट सेविंग' आहे काय हे बघावे लागते. आपल्या मोबाईल मध्ये हे ऑप्शन असते. हिवाळ्यात यूरोपमधील घड्याळे एक तास मागे केली जातात. भारतात देखील 1942 च्या काळात एक तासाचा युद्धकालीन वेळ बदल केलेला होता.(© मंगेश पंचाक्षरी)

      ज्योतिष्य अजूनही बऱ्याच जुन्या योगांवर आधारित असून त्यात नवीन संशोधन होणे आवश्यक आहे. एका गावाचे एकच अक्षांश, रेखांश  गृहीत धरून तयार केलेल्या कुंडलीपेक्षा जीपीएसच्या साहायाने प्रत्येक स्थानाचे वेगळे गणित मांडून, त्याची निरीक्षणे नोंदवून ज्योतिष आधुनिक केले पाहिजे, नवीन प्रश्ननुसार अधिक संशोधन झाले पाहिजे, निरीक्षणे नोंदवली पाहिजेत. भविष्यात तसे केले जाईल असा मला विश्वास आहे.   

- ©मंगेश पंचाक्षरी.

Comments

Popular posts from this blog

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव