कान
© मंगेश पंचाक्षरी, नासिक.
एकदा आम्ही आमच्या 'तरुण, सुंदर' मेहुणीला विचारलं "आपल्याला कान नसते तर काय झालं असतं?" त्यावर ती म्हणाली "आपल्याला नीट दिसलं नसतं!" आम्ही विचारलं "का बुवा असं?" तर ती म्हणाली "कान नसतील तर चष्मा कसा घालणार?" हे उत्तर ऐकून आमचे 'कान' लाल झाले. मुळात आम्ही मेहुणीच्या ' कानात' काय बोलतो याची बायकोला 'कानोकानी' खबर लागू देत नाही. ही नवीन पिढी 'काना'मागून येऊन तिखट होऊ पहाते आहे असं आमच्या सौ चं मत आहे. एकतर आपल्या पिढीचं काही 'ऐकून' घेण्याच्या मनस्थितीत ही पुढची पिढी नाही. आमच्या लहानपणी आमचं काही चुकलं की आम्हाला शाळेत 'कान' धरून उभे करायचे. त्यात मुख्याध्यापक सर आलेच तर तेही आमचा 'कान' पिळून जायचे. वर्गातली टारगट मुलं आमच्या 'काना'खाली आवाज काढायचे. आमचे मार्क बघून वडील आमच्या 'कान'फटात ठेऊन द्यायचे. अभ्यास कर असं आमची आई आमच्या 'कानी'कपाळी ओरडायची. उरलं सुरलं आमचं प्रगती(?) पुस्तक बघून आमचे नातेवाईकही आमची 'कान'उघाडणी करायचे. जन्माला आल्यापासून एकदा सोनाराने 'कान' टोचले आणि तेव्हापासून आमच्या 'काना'वर संक्रांत आली. बायको सोबत खरेदीला गेलो की बायकोला आम्ही काय सांगतोय ते (सोयीस्कर रीत्या) ऐकू येत नाही. तरुणपणी माणूस कोणाचं 'ऐकू'न घेण्याच्या मनस्थितीत नसतो आणि म्हातारपणी 'कान' अधू झाले की मग मशीन लावून फिरतो. एक चतुर म्हातारा कानाचं अगदी छोटं मशीन त्याच्या मित्राच्या दुकानातून विकत घेऊन घरी गेला. घरच्यांना ते दिसलंच नाही. महिनाभराने त्याच्या दुकानदार मित्राने म्हाताऱ्याला विचारलं "मशीन नीट काम करतंय ना?" तर म्हातारा म्हणाला "मी आतापर्यंत तीन वेळा माझं मृत्यूपत्र बदललंय!"
आमचं आयुष्य उत्तम, दर्जेदार संगीत ऐकण्यात गेलं. तानसेन होण्याआधी माणसाने 'कानसेन' होणं आवश्यक असतं. पण हल्ली हा 'कान'मंत्र सहसा कोणी पाळत नाही त्यामुळं हल्लीचे संगीत आम्हाला 'ऐक'वत नाही. तरुण पिढी आमचे उपदेश या 'काना'ने ऐकते आणि त्या 'काना'ने सोडून देते.
सध्या मतामतांचा इतका गलबला झाला आहे की लोकांना शांततेची गरज निर्माण झाली आहे. डीजे चे भेसूर आवाज लोकांचा रक्तदाब वाढवतात आणि 'कानात' बोळे घालून बसावं लागतं. सरकारी यंत्रणा याबाबत 'कानावर हात ठेवतात'. ज्यांच्या घराजवळ मंगल कार्यालय आहेत त्यांचं दुःख त्यांनाच माहीत. आमच्या घराजवळ एक मोठा बंगला आहे. त्याचं रूपांतर आता 'हॉटेल - क्लब- लॉन्स- मंगल कार्यालय' यांत झालेलं आहे. तेथे सुप्रीम कोर्टाचे नियम डावलून सतत रात्री एक- दोन वाजेपर्यंत 'कान'ठळ्या बसणाऱ्या भयाण आणि बेसूर आवाजात ऑर्केष्ट्रा चालू असतो. तो कर्कश्य आवाज पोलीस सोडून बाकी सर्वाना 'ऐकू' येत असतो. मागे एकदा तर 'डीजे' च्या आवाजाने भिंत पडून काही लोकं गतप्राण झाली. फटाक्यांच्या आवाजाचाही लहान मुलं, आजारी तसेच वृद्ध यांना प्रचंड त्रास होतो. पण आपला आनंद साजरा करण्यासाठी समाजाला वेठीस धरण्याची हीन प्रवृत्ती वाढीस लागली आहे. आवाजाचा प्राण्यांनाही खूप त्रास होतो. मागे एकदा एका माणसावर सूड घेण्यासाठी दुसऱ्याने त्याच्या पोल्ट्री फार्मजवळ सुतळी बॉम्ब फोडले. त्या आवाजाने घाबरून हार्ट अटॅकने हजारो कोंबड्या मेल्या. तरी बरं आम्ही विज्ञानाचा 'कानोसा' घेतला तेव्हा समजलं की माणसाला फक्त २० हर्ट्झ ते २० किलो हर्ट्झ इतकाच ध्वनी 'ऐकू ' येतो. कुत्रे आणि इतर अनेक प्राण्यांना यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी ऐकू येते. गाढवाचे कान लांब असल्याने त्यांना लंब'कर्ण' म्हणतात. एक प्रसिद्ध शिवलिंग गाईच्या 'काना'च्या आकाराचं आहे म्हणून त्यास गो'कर्ण' (महाबळेश्वर) म्हणतात. एकूणच 'काना'ची महती अगाध आहे. गुरुबद्दल आदर व्यक्त करताना शिष्य 'काना'च्या पाळीला हात लावतो आणि शिकताना कळत नकळत होणाऱ्या चुकांची कबुली देतो. बायका निरनिराळी 'कर्ण 'आभूषणे होसेने मिरवत असतात.
आपण काय 'ऐक'तो त्यावर आपलं मत ठरत असतं. राजकारणातही कुजबुज 'ही' इतर डावपेचांपेक्षा जास्त प्रभावी ठरते कारण भिंतीलाही 'कान' असतात. काही नेते मंडळी हलक्या 'कानाची' असतात. त्यामुळं अनेक सच्या कार्यकर्त्यांची 'कानशिले' विनाकारण गरम होतात. पण काय करणार? "बळी तो 'कान' पीळी!". एकूणच सध्या गोंगाटाचा माहोल आहे. इथे प्रत्येकाला मत मांडायचे आहे पण 'ऐकून' कोणालाच घ्यायचे नाहीये. देवाने आपल्याला एक तोंड आणि दोन 'कान' दिले आहेत. आपण प्रत्येकाशी जेवढे बोलतो त्याच्या दुप्पट ऐकून घेतले पाहिजे असं तर देवाला सुचवायचं नसेल?
-© मंगेश पंचाक्षरी, नासिक.
इमेल:- mangeshp11@gmail.com

Comments
Post a Comment