टेलर - दै सकाळ 17 सप्टेंबर 17

-मंगेश पंचाक्षरी, नासिक.

     आम्ही भिंतीच्या आड हळूच दबक्या पावलाने येऊन उभे राहून त्यांचे बोलणे ऐकू लागलो. "आज चोवीस खिसे आणि तीन गळे कापले" एकजण दुसऱ्याला अभिमानाने सांगत होता. दुसऱ्याने त्याच्याही पेक्षा जास्त मजल मारल्याचे फुशारकीने सांगितले. आम्ही योग्य जागी आलो आहोत याची आम्हाला जाणीव झाली. कित्येक दिवसांपासून आम्ही यांचा शोध घेत होतो. आम्ही मनाचा हिय्या करून आत घुसलो. त्या दोघांनीही आमच्याकडे रोखून पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी उमटली. आम्हाला हा अनुभव सर्वत्रच आणि नेहमीचा असल्याने बिलकुल 'खेद' वाटला नाही. ते एका प्रसिद्ध टेलरचे दुकान होते. त्यांचेकडे जाण्याशिवाय आम्हाला पर्यायच नव्हता. कारण रेडिमेड कपडे आम्हाला कधीच 'फीट' बसले नाहीत. आमचा देह नेहमीच आडमाप वाढत असल्याने आम्हाला टेलरकडून 'मापं' काढून घेण्याशिवाय गत्यंतर नसते. हल्ली आम्हाला चाळीसचा शर्ट टाईट होतो तर बेचाळीसचा शर्ट लूज होतो. आम्ही 'सव्वाएक्केचाळीस'चा शर्ट वापरला पाहिजे असे एका टेलरने आम्हाला सांगितले. पँटच्या मापांबाबतही आमची हीच तऱ्हा आहे. काही टेलर तर आमचे मोजमाप घेण्यासाठी 'जमीन' मोजणीचा टेप वापरतात. आमची देहयष्टी बघून काही टेलरनी त्यांचा पिढीजात धंदा सोडून किराणा  दुकान टाकल्याचं आम्ही पाहिलं आहे. आमचं 'वाढतं शारीरिक आणि घटतं सामाजिक' वजन हा घरात चिंतेचा विषय आहे. आमच्या 'सौ' ने घरात एक वजन मोजण्याचं डिजिटल यंत्र आणून ठेवलेलं आहे. त्यास 'वजनकाटा' हे सार्थ नाव आहे. त्यावर दर आठवड्याला 'वजन' करताना आमच्या अंगावर 'काटा' येतो. आमच्या मनाचं समाधान व्हावं म्हणून आम्ही केस कापून आल्यावर गुळगुळीत दाढी करून वजन करतो. हेतू हा की वजन अचूक (म्हणजे कमीत कमी?) यावं. हे यंत्र आम्ही बाथरूम मध्ये ठेवलं आहे. तिथे आम्ही अगदी 'जानवं' देखील उतरवून ठेवतो. तेव्हडच कमी वजनाचं समाधान! "तसंही हल्ली जानव्याचं वजन पेलवण्याइतकं 'ब्राह्मण्य' किती लोकांमध्ये शिल्लक राहिलं आहे?" आमचं डिजिटल यंत्र दरवेळी आमचं वाढीव शारीरिक वजन दाखवतं. त्याचे आकडे लाल रंगात(च) का असतात ते आता आम्हाला कळलं आहे.

      आमच्या 'उसवलेल्या' आयुष्यात एकदा तरी आम्हाला वेळेत कपडे शिवून देणारा टेलर बघायचा होता. आमचा नेहमीचा टेलर आमचे कपडे इतके उशिरा शिवून द्यायचा की आम्ही त्या टेलरचा चेहरा देखील विसरलेलो असायचो. तो समोरून गेला तरी आम्ही त्याला ओळखायचो नाही. काही टेलर तर आमचं कापड घेऊन 'रफू'चक्कर झाले. एरवी टेलरने दिलेल्या पोहोचपावतीवरची तिरकी कापलेली चिंधी बघून आपणच आवडीने विकत घेतलेल्या कापडाची 'पॅन्ट आणि शर्ट' आम्हाला कधीच ओळखता आले नाहीत. अगदी पांढरं कापड घेतलं तरीही आमचा गोंधळ होतो आणि 'व्हाईट कॉलर' असल्याने आम्ही ओशाळतो. आमच्या नेहमीच्या टेलरकडे आम्ही लग्नाच्या वेळी शिवायला टाकलेला 'सूट' आमचं शुभमंगल लागल्यावर अर्ध्या तासाने त्याने कार्यालयात पोहोच केला होता. एकंदरीत रेडिमेड कपड्यांप्रमाणे टेलर हा प्रकारही आम्हाला 'सूट' होत नाही. यावरून आम्हाला एक जुना किस्सा आठवला. एकदा एका माणसाने टेलरकडे शर्ट शिवायला टाकला आणि त्याच काळात काही कारणाने त्याला कोर्टातून दहा वर्षांची शिक्षा झाली. जेलमधून शिक्षा भोगून बाहेर पडताना जेव्हा त्याने नेहमीचे कपडे घातले तेव्हा त्याला खिशात त्या टेलरची पोहोच -पावती सापडल्याने शर्ट शिवायला टाकल्याची आठवण होऊन तो तडक त्या टेलरकडे गेला तेव्हा  पावती बघून टेलर त्याला निर्विकारपणे म्हणाला की शर्ट तयार आहे फक्त 'काजे' बाकी आहेत. इतकी तत्पर सेवा आमच्या काळात मिळत असे. हा अनुभव बघून आम्ही एका मित्राच्या आग्रहास्तव दुसऱ्या टेलरकडे गेलो. त्याने त्याचा कारागीर खास 'मद्रास'हून आल्याचं सांगितलं. आता मद्रासचा आणि टेलरिंगचा नक्की काय संबंध हा विचार आम्ही तेव्हा केलाच नाही. जे आपल्या इथलं नाही ते 'भारी' अशी आपली मानसिकता झालेली आहे. एखादं लोकेशन किती सुंदर आहे हे सांगताना "असं वाटतं आपण भारतातच नाहीये!" असं आपले लोकं वर्णन करतात. तसाच विचार करून आम्ही 'त्या' कारागिराला मापं दिली. त्याने आमचे 'हाफ' शर्टचे माप घेऊन 'फुल' शर्ट शिवला. आम्ही ते बघून अवाकच झालो. "कापड जरा जास्त होतं म्हणून फुलशर्ट शिवला" तो बोलला. पण त्याने मुळात आमचे फुल शर्टचे माप घेतलेलेच नसल्याने आमच्या शर्टच्या बाह्या 'जीवनधारा' ब्लाउज सारख्या हाफ आणि फुलच्या मध्येच आल्या. आम्ही मग त्या बाह्या मद्रासी टेलरच्या लुंगीप्रमाणे मुडपून तो शर्ट काही काळ वापरला. पुढे आमच्यामुळे ती फॅशन रूढ झाल्याने त्या मद्रासी कारागिराचा धंदा वाढला.

     आम्ही पुन्हा एका दुसऱ्या मित्राच्या आग्रहास बळी पडून आमच्या गावातील एका नामांकित (?) टेलरच्या आलिशान दुकानात गेलो. त्याने आम्ही सोबत नेलेल्या कापडाला कशी क्वालिटी नाहीये ते आम्हाला समजावून सांगितलं. आम्ही त्याला ते कापड देशातील प्रसिद्ध ब्रॅंडच असल्याचं सांगितल्यावर ते 'डुप्लिकेट' असल्याचं सांगायला तो विसरला नाही. मग आम्ही त्याच्याकडूनच कापड विकत घेतलं. आम्हाला आमच्या स्वभावाप्रमाणेच 'अघळपघळ' कपडे लागतात हे आम्ही त्याला निक्षून सांगितलं. त्यात आमचं वाढलेलं पोट लपवायचं असतं हा  अंतस्थ हेतू असतो हे आम्ही कधी कोणाला कळू देत नाही. आमचा खिसा सोडला तर आम्ही सर्व बाजूने भरलेलो आहोत. तरीही आम्ही 'मेंटेन' आहोत असा आमचा स्वतःचा दृढ समज आहे. गेल्या दहा वर्षांपासूनचा  नाईटड्रेस आम्हाला अजूनही होतो आहे हा या गोष्टीचा पुरावा आहे. त्या वस्त्राला 'लुंगी' म्हणतात. टेलरनी आम्हाला खिशातील सर्व वस्तू टेबलवर काढायला सांगून आमची मापं घेतली. आम्ही विमानतळावर तपासणी अधिकाऱ्यांपुढे उभे राहावे तसे उभे राहिलो. टेलरच्या गोड बोलण्याने  त्याच्याशी आमचा 'धागा' जुळेल असा आम्ही अंदाज केला. कारागीर मद्रासी नाही याची आम्ही यावेळी खात्री करून घेतली. पाच दिवसांनी आम्ही जेव्हा कपडे ताब्यात घेण्यास गेलो तेव्हा ते अत्यंत 'टाईट' होत असल्याचे आम्हाला जाणवले. आम्ही त्यास तसे सांगितले असता हल्ली तंग कपड्यांची फॅशन असल्याचा त्याने सूर लावला. आम्ही त्यास त्यात सुधारणा करण्यास सांगितले. पुनः चार दिवसांनी गेलो तरीही कपडे तसेच म्हणजे आमच्या आर्थिक परिस्थितीसारखेच  तंग होते. त्यांना उसवण्यास टेलरने 'तुस'भरही जागा ठेवली नव्हती. आम्ही आक्षेप घेतल्यावर त्याने पुनः आमच्या पोटावर आणि फॅशनच्या मुद्द्यावर एकच 'टेप' लावली. आम्हीच कसे ओबडधोबड आहोत हे त्याने आम्हाला समजावून सांगितलं. त्याच्या जागी साक्षात 'एलिझाबेथ टेलर' असती तरीही आम्हाला हे फॅशनचे कारण पटले नसते. आम्ही तिथल्या एका मराठी कारागिरास हळूच तंग कपडे शिवण्याचे रहस्य विचारले. "त्या टेलरकडून कापड विकत घेतल्यास तो ग्राहकाकडून जास्त कापडाचे पैसे घेतो मात्र प्रत्यक्षात कमीतकमी कापडात ड्रेस बसवतो म्हणून सगळ्यांचे कपडे फॅशनच्या नावाखाली टाईट शिवले जातात" त्याने खुलासा केला. सुरुवातीस सांगितल्या प्रमाणे तो दिवसभरात किती 'खिसे' कापत असेल याचा अंदाज लावत आम्ही ते कपडे घेऊन घरी आलो. 'माप दिल्यापासून दहा दिवसात आमचे वजन इतके वाढले की नवीन कपड्यात आम्ही पहिल्याच दिवशी मावेनासे झालो' असा  सौ ने समज करून घेतल्याने आमच्या घरातलं वातावरण सध्या आमच्या नव्या कपड्यांपेक्षाही 'तंग' आहे.

-मंगेश पंचाक्षरी, नासिक.

Comments

Popular posts from this blog

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव