राशीभाव

आम्ही ज्योतिषी आहोत पण तरीही ज्योतिष्यावर गाढ विश्वास ठेवणारे लोक आमची चांगलीच पंचाईत करतात हो. आता कालचीच गोष्ट घ्या. आमच्याकडे एक वृश्चिक राशीचा माणूस आला. आम्ही त्याची पत्रिका बारकाईने तपासून सांगितलं की तुझं सर्व काही छान आहे फक्त फालतू खर्च टाळा तर त्याने आमची दक्षिणाच दिली नाही! आमच्याकडे बायका नवऱ्याची पत्रिका घेऊन येतात. आम्ही अभ्यासून त्याना त्यांच्या नवऱ्याच्या भविष्याबद्दल सांगायला सुरुवात करतो तर त्या म्हणतात "भविष्य गेलं खड्यात. त्याचा भूतकाळ सांगा मग भविष्य मी ठरवते त्याचं!" काय काय नमुने बघत असतो आम्ही. वृषभ राशीच्या बायका सत्यनारायण च्या पूजेला स्लीवलेस घालून बसतात. त्या भटजींचं लक्ष लागत नाही हो पूजेत. सिंह राशीचा माणूस कधीच वेटर होत नाही कारण त्याला 'ऑर्डर' घ्यायची सवय नसते.  एकदा आमच्या दारावरची बेल बिघडली म्हणून आम्ही 'मीन' राशीच्या इलेक्टिशियन ला निरोप देऊन आलो. पाच दिवस झाले तरी पठ्ठा आलाच नाही. शेवटी आम्ही फोन केला तर म्हणतो " मी तीन वेळा येऊन गेलो साहेब, कितीवेळ बेल वाजवली, कोणी दारच उघडलं नाही.
राशी लोकांच्या चालण्यातूनही समजतात. साधं मॉर्निंग वॉक ला जाऊन बघा. मेष वाले एकटेच जोरजोरात चालत असतात. वृषभ वाले एक राऊंड सरळ तर एक राऊंड उलट्या दिशेने मारतात. "सगळे चेहरे दिसले पाहिजेत ना!" मिथुन वाले गप्पा मारत चालतात. मग किती राऊंड झाले असे एकमेकांना विचारतात. नेमका आकडा कोणालाच सांगता येत नाही. मग दमले की घरी जातात. कर्क राशीच्या बायका वॉक करतानाही आज कोणती भाजी करावी, रेसिपी, नणंद, सासूबाई याच विषयांवर बोलत असतात. माणस अशी का वागतात हा प्रश्न संपून माणसं अशीच वागणार हे या कार्यक्रमातून समजतं.

(मंगेश पंचाक्षरी यांच्या 'राशीभाव' या बारा राशींवर आधारित टॉक शो मधील काही अंश)

-© मंगेश पंचाक्षरी, नासिक.
इमेल:- mangeshp11@gmail.com

Comments

Popular posts from this blog

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव